हे पुस्तक भाषांतररूपाने लिहिले आहे. यात फक्त अकबर बादशहाचे सविस्तर वृत्त आहेच परंतू एकंदर मोगल बादशाहीचा उत्कर्ष कोणी व कसकसा केला याची साद्यन्त व खुलासेवार माहिती दिलेली आहे. मूळचे इंग्रजी पुस्तक एका नामांकित ग्रंथकाराने लिहिले असून ते विद्वज्जनांच्या आदरास पात्र झाले आहे. त्याची ही प्रतिकृती. 'मागासलेला म्हणून गणलेल्या प्रांतातील एका गावात असणाऱ्या व वाग्देवीच्या मंदिराचा उंबरठा देखील ज्याने ओलंडिला नाही' अशा एका अप्रसिध्द साहसिकाने हे पुस्तक मराठी भाषेत उतरविण्याचे धाडस केले आहे. ते त्यास चांगले साधले नसेल हे तो जाणून आहे. तथापि त्यातील दोष विद्वज्जनांच्या परिक्षणांनी कळून आल्यास दुसरी एखादी तसबीर उतरण्याच्या कामी मदत होईल एवढ्याच हेतूने ही मायबोली 'मराठीची' केलेली अल्प सेवा महाराष्ट्रातील विद्वज्जनापुढे आणली आहे. हे भाषांतर छापून प्रसिध्द करण्याच्या कामी अनेक अडचणी आल्या. परंतु वरदा प्रकाशनाने हे काम उत्साहाने आणि वाचकांना भारतीय इतिहासातील मर्म कळावे यासाठी निष्ठेने प्रकाशित केले आहे.