भारतीय मूर्तिपूजेचा सर्वसाधारण आढावा घ्यावा एवढाच उद्देश या लिखाणामागे आहे. भारतीय मूर्तिपूजेचा विचार करताना सर्वांत पहिल्यांदा आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो की पूजा म्हणजे काय ? म्हणून त्याचे विवेचन सुरुवातीलाच दिले नंतर या पूजेतील साधना आणि पद्धती यासाठी एक स्वतंत्र प्रकरण खर्ची घातले आहे. अनेक वेळा आपण प्रत्यक्ष पाहतो किंवा त्याचा प्रयोग करतो परंतु त्यामागील भूमिका किंवा उद्देश आपल्याला माहीत नसतो. म्हणून तो देण्याचा प्रयत्न केला आहे. मूर्तिपूजेची सुरुवात कशी झाली व ती कधी झाली हे सांगणे तसे कठीण आहे. तो प्रयत्न अनेक तज्ज्ञांच्या मताधारे घेऊन देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मूर्तिपूजेचा उगम-विकास व त्याच्या बदलत्या रूपाचा परिचय करून दिला आहे. अशा मूर्तिपूजेचा संदर्भ शोधताना अनेक काळात व माध्यमांत तिचे स्वरूप व रूप काय आहे हे शोधण्यासाठी प्राचीन ग्रंथ व महाकाव्य यात डोकावून पाहिले आहे. या सर्वांचा सखोल संदर्भ घेण्यापेक्षा त्यातील रूपरेषेचे दर्शन घडवले आहे.यानंतर भारतीय धर्मात व त्याच्या पंथ- उपपंथांत मूर्तिपूजेला त्याच्या मतानुसार किंवा समजुतीनुसार स्थान दिले आहे ते कसे केव्हा व का दिले गेले याचाही परिचय थोडक्यात करून दिला आहे. हा परिचय दिल्यानंतर भारतीय कलेत मूर्तिपूजेला फार फार वेगळे स्थान आहे. कारण भारतीय कला ही येथील मंदिरे आणि धार्मिक स्थळातच विकसित पावली आहे आणि येथील धर्म व धर्मधुरिणांनी तिला आश्रय दिला आहे असे दिसून येते. त्याचा आढावा एका प्रकरणात घेतला आहे. भारतीय मूर्तिपूजेची सुरुवातच मुळात प्रतीकपूजेतून झाली आहे त्यामुळे येथील प्रतीकांना एक आगळे-वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. त्यातील लिंगपूजेने सुरुवातीपासून आपले अस्तित्व अतिशय प्रभावीपणे टिकवून ठेवले आहे. याकरिता या लिंगपूजेची सविस्तर चर्चा केली आहे. या सर्वांचा विचार करताना या प्रदीर्घ इतिहासात किंवा काळात काही आधुनिक व्रतांनी आपले अस्तित्व व प्रगती दर्शवली आहे. अशा व्रतांचा मागोवा घेण्याचा येथे प्रयत्न केला आहे.