श्रीमंत सरकार सयाजीरावमहाराज गायकवाड यांची ज्ञानार्जनाची आवड महशूर आहे. घरी असोत किंवा प्रवासात असोत त्यांचा ज्ञानप्राप्तीचा उद्योग कधी थांबत नाही. सन 1905 - 06 मध्ये त्यांनी युरोपात प्रवास केला त्या वेळी ते ग्रीस देशात गेले. तो देश प्रत्यक्ष पाहून तेथील भयंकर स्थित्यंतराची मूर्तिमंत कल्पना त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहिली आणि कालचक्राच्या फेऱ्यांत गोते खाणाऱ्या राष्ट्रास इतिहासाचे मार्मिक अध्ययन हेच खरे त्राण व आशाबंधन आहे अशी खात्री साहजिक त्यांच्या मनाला पटली. तत्क्षणी ह्या ग्रीस देशाचा प्राचीन इतिहास हिंदी मुलामुलींनी अवश्य वाचला पाहिजे अशी प्रबल इच्छा उत्पन्न होऊन त्यांनी ते काम ताबडतोब करविण्याचा हुकूम पाठविला. तद्नुसार हे पुस्तक मुद्दाम तयार केले आहे. ह्याने ग्रीसच्या इतिहासातील ठळक-ठळक गोष्टी व स्थित्यंतरे यांचा थोडक्यात बोध व्हावा आणि विषय कंटाळवाणा होऊ नये असा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचून पुढे ग्रीक देशाचे मोठमोठे ऐतिहासिक ग्रंथ वाचण्याची स्फूर्ती आपल्या लोकांस होईल अशी आशा आहे.