या हे पुस्तक जुन्या मुंबई राज्याचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस श्री. एम. केनेडी यांनी १९११ पूर्वी लिहिले त्या पुस्तकाचे नाव होते Criminal classes in the Bombay presidency. हे पुस्तक केनेडी यांनी पोलिस खात्याच्या उपयोगासाठी लिहिले होते. हे पुस्तकाचे मराठी भाषांतर व संक्षेष श्री. त्रिंबक नारायण आत्रे ह्यांनी १९११ साली केले व स्वतःच प्रसिद्ध केले. श्री. त्रिं. ना. आत्रे त्या वेळी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे सबजज्ज होते. हे पुस्तक मुख्यतः पोलिस खात्यासाठी जरी लिहिले असले तरी तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी जो सामाजिक अभ्यास केला त्याचा समावेश या पुस्तकात केलेला आहे. यातील दृष्टिकोन उघडच तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांचा आहे. पण त्यांनी मिळविलेली माहिती मात्र समाजशास्त्राच्या व भाषेच्या अभ्यासकाला फार महत्त्वाची वाटेल अशीच आहे. उदाहरणार्थ : प्रत्येक जात आपसात बोलताना जी सांकेतिक भाषा वापरत असत त्यातील शब्दांच्या याद्याच त्या शब्दांच्या अर्थासह दिल्या आहेत. या निरनिराळ्या जातीतील लोक वेषांतर कसे करीत गुन्हे करताना कोणती पद्धत वापरीत यासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. एखादी जात गुन्हेगार असते ही संकल्पना आता पार बदलली आहे. पण या पुस्तकात दिलेल्या गुन्हे करणाऱ्या जातींमध्ये सर्व प्रकारच्या पोटजातींचा समावेश आहे. उदाहरणार्थ: जदुये ब्राह्मण ही एक ब्राह्मणांची पोटजातही गुन्हेगार जातीत समाविष्ट केलेली आढळेल! या पुस्तकाचे महत्त्व आता केवळ ऐतिहासिक आहे व जमा केलेल्या महत्त्वाच्या माहितीचे संकलन असे त्याचे स्वरूप आहे. तरीपण गुन्हे करण्याच्या विविध पद्धती चोरीचा माल खपवण्याच्या युक्त्या वगेरे गोष्टी सामान्य वाचकासही मनोरंजक वाटतील हे पुस्तक पुन्हा उपलब्ध झाल्याने सामाजिक अभ्यास करणाऱ्यांना एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ मिळेल.