आयुष्याच्या वाटेवर अनेक अनुभव येतात. .सुख दुःखाचे प्रसंग मनाच्या कपारीत खोलवर रुतून राहतात. अंतरंगात साठवून ठेवलेल्या अनेक भावनांचा बांध ज्या वेळेस वाहू लागतो.त्या वेळेस कविता जन्माला येते... काळीज पिळून ज्या वेळेस आत्मा रक्तबंबाळ होतो त्या वेळेस अंतरंग रिक्त होते आणि डोळ्यांवाटे निर्मळ अश्रू बरसू लागतात.सगळ्यांच्याच आयुष्यात सुख - दुःखाच्या राशी असतात. आणि या राशी ओलांडताना कधी पायांना मधू स्पर्श तर कधी जखमा होतात.आणि या दोन्ही प्रसंगात पुढे चालत राहणे म्हणजे आयुष्य आत्मा पोळून निघाला की माणूस परिपक्व होतो.आयुष्याचा खरा अर्थ शोधू लागतो.आणि याच शोधात स्वतःला स्वतःचीच ओळख होते.भोगलेले सुख - दुःख सारेच सरिपटावर सजू लागते.आणि या साऱ्याच भावनांना शब्दरूप येते. प्रत्येक प्रसंगाचे प्रत्येक स्पंदनांचे आणि प्रत्येक उन - सावलीचे खेळ मुक्त होऊ लागतो माझेही आयुष्य व्यापून उरले आहे.त्या माझ्या हृदयाच्या स्पंदनातून अलगद उमलले निर्भयचे अंतरंग.त्याला शब्दरूप देण्याचा हा एक भाबडा प्रयत्न...