इंद्रभुवन गुहा' ही कादंबरी रहस्यमय व ऐतिहासिक असून ती हजार वर्षापूर्वीच्या वातापी साम्राज्यात घडून येते. हे वातापी साम्राज्य दक्षिण महाराष्ट्र व कर्नाटक दरम्यान होते. हे वातापीनगर सध्याच्या कर्नाटकातील बदामीच्या परिसरात होते. अजूनही बदामी येथेजुन्या राजधानीचे अवशेष सापडतात. बदामी हा तालुका सध्याच्या विजापूर जिल्ह्यातील कर्नाटकात आहे. या बदामी शहराजवळच एक डोंगर असून त्या डोंगरात रत्नांनी आणि संपत्तीने भरलेली एक मोठी गुहा होती व त्या गुहेलाच 'इंद्रभुवन गुहा' असे नाव होते. बराच काळ लोटल्यामुळे अनेकांच्या स्मरणातून नष्ट झालेल्या इंद्रभुवन गुहेचा व त्यातील संपत्तीचा शोध घेण्याचा या कादंबरीत प्रयत्न दाखविला आहे. शेवटी 'इंद्रभुवन गुहा' सापडतेच आणि शेवटी सगळेच गोड होते. पण त्यापूर्वी कारस्थाने लढाया चित्तथरारक प्रवास यांच्या रोमहर्षक हकिगतीत वाचकाचे मन या कादंबरीत अगदी गुंतुन पडते.श्री. गो. ना. दातार हे माझ्या कुमारवयात मनावर जबरदस्त ठसा उमटवून गेलेले कादंबरीकार. त्यांच्या कांदबऱ्या म्हणजे कमालीची रंजकता कल्पकता. वाचकाला खेचून नेणारी रहस्यमयता अद्भुत घटनांचा अखंड ठसठशीत प्रवाह व्यक्तीचित्रणे चित्रात्मक शैलीतील वर्णने आणि प्रौढ पण रसाळ भाषा यांचा एक मनोहर मिलाफ दातारांच्या कादंबऱ्यात झालेला आहे. घरात जवळपास वा वाचनालयात उपलब्ध होणाऱ्या त्यांच्या सर्व कादंबऱ्या मी शोध घेऊन वाचल्या; पण कालिकामूर्ती व बंधुद्वेष अधिक आवडल्या. आपल्या नित्य जीवनातून एका रंगीबेरंगी विश्वात आपल्याला नेण्याचे या कादंबऱ्यांचे सामर्थ्य असाधारणच आहे. रेनॉल्ड्स यांच्या कादंबर्यांवरुन या कादंबऱ्या रुपांतरीत केलेल्या आहेत हे पुढे केव्हा तरी मला कळले. काहीच बिघडले नाही. परस्थतेचा वास देखील या लेखनाला कधी आला नाही. उत्तम रुपांतर ही देखील एका मर्यादेत; पण नवनिर्मितीच असते. मराठी कादंबरीच्या विकासात दातारांचे ऋण कोणी ना मानो; मी मात्र वाड्.मयीन व्यवहाराकडे वाचकाला वाहून नेणारा एक प्रकांड साहित्यकार म्हणून त्यांना खूप मानतो. रहस्यकथांत रस असणाऱ्यांसाठी दातारांनी हा अमोल खजिनाच निर्माण करुन ठेवला आहे.- वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)