*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹131
₹150
12% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
के. के. बिर्ला फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा अखिल भारतीय पातळीवरचा सरस्वती सन्मान या नाटकाच्या निमित्ताने प्रथमच एका मराठी नाटककाराला मिळाला. हा सर्वोच्च सन्मान विजय तेंडुलकरांना मिळावा याविषयी कोणाचेही दुमत नव्हते; परंतु तो त्यांच्या कन्यादान या नाटकाला मिळावा याचे काहीसे आश्चर्य अनेकांना वाटणे स्वाभाविक आहे. तेंडुलकरांच्या ज्या नाटकांना अमाप प्रसिद्धी मिळाली (शांतता! कोर्ट चालू आहे) ज्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले (घाशीराम कोतवाल) किंवा ज्यांमुळे तेंडुलकर वादाच्या भोवऱ्यात सापडले (गिधाडे सखाराम बाइंडर) अशा नाटकांपुढे कन्यादानचे कौतुक झाले नव्हते किंवा त्या नाटकाचे मोठेपण जाणवले नव्हते.कन्यादान या नावापासूनच कौटुंबिक जिव्हाळ्याचे असावे असा आभास निर्माण करणारे हे नाटक आशयाची मोठी उंची गाठते. आज अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या विषयासंबंधीची एक प्रगल्भ समाजशास्त्रीय जाण या नाटकातून व्यक्त होते. दलित विचारधारणा समाजवादी विचारधारणा स्त्री-पुरुष संबंध यासंबंधीचे फार वेगळ्या पातळीवरचे विचार या नाटकाच्या गाभ्याशी आहेत. याविषयीची एक कार्यकर्ते म्हणून असलेली विजय तेंडुलकरांची मते सर्वज्ञात आहेत. आणि तरीही हे नाटक कुठेही प्रचारकी होताना मात्र दिसत नाही. कारण नाटकातील प्रत्येक पात्राचे मानसशास्त्रीय आकलन लेखकाला आहे. नाथ देवळालीकर सेवा ज्योती अरुण एवढेच नव्हे तर संपूर्ण नाटकात जवळ जवळ नगण्य ठरलेला जयप्रकाश यांचे परस्परांतले संबंध स्वाभाविक वाटतात. त्यांच्या विचार करण्याच्या वागण्याच्या पद्धतीत लेखकाचा विचार डोकावत नाही. हेच या नाटकाचे फार मोठे यश आहे.