जव्हार जि. ठाणे ह्या गावाच्या परिसरात तेथील आदिवासी वस्त्यांमध्ये 'विठू मास्तर' ह्या 'जवळच्या' नावाने मोठे प्रसिद्ध असलेले डॉ. वि. भि. ऊर्फ सुधीर फडके ह्या एका समाजसेवकाचे हे आत्मचरित्र त्यांनी साधारणपणे १९७३ सालातले लिहिलेले असावे.व्यवसायाने आणि शिक्षणाने 'सुया' टोचणारे डॉक्टर असूनही तळागाळातल्या विशेषतः आदिवासी क्षेत्रात त्यांनी जे कार्य केले त्याचे इत्थंभूत लिखाण आपल्याला आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात दिसते. यासाठी त्यांनी पुण्यातून साम्यवादी विचारांचा वारसा उचलला.लहानपणातच विलक्षण निरीक्षणशक्तीमुळे सामाजिक विषमता अन्याय अत्याचार यांचे दर्शन त्यांनी टिपले आणि इतरांसाठी कष्ट उपसण्याचे ध्येय बाळगून कामाला सुरुवात केली. डॉक्टरकीचा व्यवसाय यशस्वी करून फावल्या वेळात समाजसेवा करता-करता ते काव्यरचनाही करीत. तेव्हा या तिन्ही दृष्टिकोनातून हे आत्मचरित्र फारच महत्त्वाचे ठरते.