ही कादंबरी 1915 मध्ये प्रसिद्ध झाली यातील कथानक मुंबईतील गिरगाव मूगभाट वगैरे भागात घडते. या कादंबरीतील सामाजिक परिस्थिती 1910 च्या सुमाराची आहे. ही कथा मुख्यत दादासाहेब भिसे या कारखानदाराला झालेल्या मानसिक यातनांची आहे. त्यांनी आपल्या जीवनातील काही महत्वाच्या घटना गुप्त ठेवल्या व त्या ज्यांना माहित झाल्या त्यांनी त्यांना धमक्या देऊन ब्लॅकमेल केले. या कादंबरीत फक्त भिसे यांच्या मानसिक यातना न सांगता त्या काळच्या कामगारवस्तीचेही यथायोग्य चित्रण केलेले आहे. मुंबईतील कामगार चळवळीचा तो सुरूवातीचा काळ होता. संपाचे दुष्परिणाम यात चांगल्या तऱ्हेने रंगविलेले आहेत. शंभर वर्षापूर्वीचा मुंबईतील कामगार संप व चाळीतील कुटुंबे त्यांचे पारदर्शक चित्रण या कादंबरीत आढळते. शंभर वर्षापूर्वीचा मुंबईतील समाज कसा होता हे डोळ्यासमोर उभे रहाते. कादंबरी सामाजिक असली तरी रहस्यमय व उत्कंठावर्धक आहे यात शंका नाही.श्री. गो. ना. दातार हे माझ्या कुमारवयात मनावर जबरदस्त ठसा उमटवून गेलेले कादंबरीकार. त्यांच्या कांदबऱ्या म्हणजे कमालीची रंजकता कल्पकता. वाचकाला खेचून नेणारी रहस्यमयता अद्भुत घटनांचा अखंड ठसठशीत प्रवाह व्यक्तीचित्रणे चित्रात्मक शैलीतील वर्णने आणि प्रौढ पण रसाळ भाषा यांचा एक मनोहर मिलाफ दातारांच्या कादंबऱ्यात झालेला आहे. घरात जवळपास वा वाचनालयात उपलब्ध होणाऱ्या त्यांच्या सर्व कादंबऱ्या मी शोध घेऊन वाचल्या; पण कालिकामूर्ती व बंधुद्वेष अधिक आवडल्या. आपल्या नित्य जीवनातून एका रंगीबेरंगी विश्वात आपल्याला नेण्याचे या कादंबऱ्यांचे सामर्थ्य असाधारणच आहे. रेनॉल्ड्स यांच्या कादंबर्यांवरुन या कादंबऱ्या रुपांतरीत केलेल्या आहेत हे पुढे केव्हा तरी मला कळले. काहीच बिघडले नाही. परस्थतेचा वास देखील या लेखनाला कधी आला नाही. उत्तम रुपांतर ही देखील एका मर्यादेत; पण नवनिर्मितीच असते. मराठी कादंबरीच्या विकासात दातारांचे ऋण कोणी ना मानो; मी मात्र वाड्.मयीन व्यवहाराकडे वाचकाला वाहून नेणारा एक प्रकांड साहित्यकार म्हणून त्यांना खूप मानतो. रहस्यकथांत रस असणाऱ्यांसाठी दातारांनी हा अमोल खजिनाच निर्माण करुन ठेवला आहे.- वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)