प्रापंचिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर विशेषतः नोकरीतून निवृत्त आयुष्याच्या उत्तरार्धात कसं जगायचं हे तसं पाहता प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर, जगताना तोवर आलेल्या अनुभवांवर आणि पुढील जबाबदाऱ्यांवर अवलंबून असतं. कोकणातील प्रसिद्ध लेखिका वैशाली पंडित यांनी आपल्या निवृत्तीनंतर आयुष्याचा रसिकतेने आणि रसरशीतपणे अनुभव घ्यायचं मनाशी पक्कं केलं आणि त्यातूनच मंत्रभूल हा ललित लेखसंग्रह आकाराला आला आहे. याबद्दल त्या आपल्या मनोगतात म्हणतात, “सांसारिक जबाबदाऱ्यातून नवनिवृत्ता अशी मी, माझी मी... माझ्यासाठी मी... अशी जेव्हा सुटवंग झाले तेव्हा आजूबाजूला भिरभिरणाऱ्या आनंदाची शेकडो फुलपाखरं मला दिसली. नुसती दिसली नाहीत;त्यांनी त्यांच्या मनमोहक रंगांत मला रंगवून सोडलं. त्या आनंदाचा मंत्र मला अनोखीभूल घालू लागला.” रोजच्या जगण्यात लेखिकेला आलेले अनेक सहज सुंदर अनुभव, वैयक्तिक कारणासाठी झालेला प्रवास, भेटलेली माणसं यातून या लेख संग्रहातील २६ लेख लिहिले आहेत. हे अनुभव एका पातळीवर वैयक्तिक असले तरी त्यात वाचकांना आनंद देणारं, समृद्ध करणारं असं बरंच आहे. लेखिकेविषयी वैशाली पंडित या मालवणस्थित लेखिका असून आजवर त्यांनी तरुण भारत, पुढारी, लोकमत या वृत्तपत्रातून सदर लेखन केले आहे. मिळून साऱ्याजणी मासिकातही त्यांनी सदर लेखन केले आहे. ‘अंतर्नाद’ ‘आरती’ या मासिकांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. यापूर्वी त्यांच्या दोन कादंबऱ्या, तीन ललितलेख संग्रह आणि एक कथासंग्रह असे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.