कुतूहल हा माणसाचा स्थायिभाव आहे. किंबहुना या गुणामुळंच माणसानं आत्तापर्यंतची प्रगती साधली. या प्रवासात अनेक वादळवाटा आल्या, आव्हानं आली आणि त्यातूनच माणसांच्या, त्यांच्या संघर्षांच्या, जगण्याविषयीच्या धारणांच्या, व्यक्ती, कुटुंब, समाज आणि सामाज व्यवस्था, राज्यसंस्था यांच्यातील संबंधांच्या कथा-दंतकथा साकारत गेल्या. या कथाही मानवी प्रवासाइतक्याच अद्भुतरम्य असतात. अशा कथांचे, किश्शांचे तुकडे निवडून त्यांची गोष्ट बनवण्याचं काम लेखकानी अत्यंत परिश्रमपूर्वक केलं आहे. या निमित्तानं जगातील निरनिराळे भाग, तिथली संस्कृती, ऐतिहासिक घटना, त्यांचे नायक-खलनायक किंवा या दोन्हीच्या सीमारेषांवर वावरणारी पात्रं यांची अनोखी गुंफण यात साकारली आहे. या पुस्तकातील लेख किंवा कथा प्रदीर्घ इतिहासाच्या पटावरील माणसं, घटना, संस्कृती यांतील ताणेबाणे सांगत पुढं जातात, वाचकाला खिळवून ठेवतात, रिझवतात. लेखक संगमनेर महाविद्यालयात गेले २२ वर्षे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अध्यापनाचे काम करत आहेत. त्यांनी ‘अरुण साधू : व्यक्ती आणि वाङ्मयदर्शन’ या विषयावर पीएच्.डी. संपादन केली आहे. सध्या ते पीएच्.डी. आणि एम्.फिल.चे संशोधन मार्गदर्शक म्हणूनही कार्य करतात. त्यांच्या अभ्यासाचे आणि लेखनाचे विषय हे प्रामुख्याने साहित्य इतिहास आणि धर्म हे आहेत. त्याअनुषंगाने त्यांनी आजवर दैनिक सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, पुढारी, देशदूत, सार्वमत इत्यादी वृत्तपत्रांमधून नियमित लेखन केले आहे.