आपल्या संस्कृतीमध्ये तिथी आणि त्यानुसार येणारे सण-वार यांना विशेष महत्त्व आहे. असे तिथीनुसार येणारे अनेक सण आपल्याकडे पूर्वापार साजरे केले जातात. प्रत्येक मराठी महिन्यातील पौर्णिमा ही अशीच एक अतिशय महत्त्वाची तिथी समजली जाते. ज्येष्ठ ज्योतिषी आणि अभ्यासक ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात मराठी महिन्यातील पौर्णिमांची पार्श्वभूमी आणि त्यांचा इतिहास अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण पद्धतीने सांगण्यात आला आहे. आपल्याकडे तिथी सणवार कसे साजरे केले जातात याबद्दल प्रचंड कुतूहल असते. त्याबरोबर त्यामागचा इतिहास त्याची कारणे याबद्दल जाणून घेण्याची ज्यांना इच्छा आहे शंका आणि गैरसमज ज्यांना दूर करावेसे वाटतात त्यांच्यासाठी हे संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे. लेखक ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे यांच्याबद्दल: श्री. देशपांडे यांना पहिल्यापासूनच पौरोहित्य ज्योतिष याची आवड होती. नोकरी सोडल्यानंतर ते पूर्ण वेळासाठी यात सक्रिय झाले. त्यांनी ज्योतिषशास्त्राचा स्वत:हूनच अभ्यास केला आणि ते ज्योतिष परिषदेचे आजीव सभासद बनले. मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणांहून प्रसिद्ध होणार्या अनेक ज्योतिष विषयक संत साहित्याशी संबंधित आणि भक्तीविषयक मासिकांतून ते सातत्याने लिखाण करत असतात. आजवर त्यांची १२५ हून अधिक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.