अखिल मानवजातीस अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आरोग्य होय. आरोग्य हीच संपत्ती आहे व ही संपत्ती प्रथम मिळविण्यावर सर्व जीविताचे सुख अवलंबून आहे. आरोग्यशास्त्राची व्याप्ती इतकी मोठी आहे की तीत इतर अनेक उपयुक्त शास्त्रांचा व विषयांचा समावेश होत असतो. शास्त्रीयदृष्ट्या आरोग्यशास्त्राच्या अभ्यासास नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आरोग्यशास्त्राचे ध्येय म्हणजे अनेक रोगांची चिकित्सा करून त्यांविरुद्ध सारखी लढाई चालू ठेवण्याचे असे; परंतु ज्याप्रमाणे इतर शास्त्रांत प्रगती होत आहे त्याप्रमाणे आरोग्यशास्त्रातही अलीकडे नवीन नवीन उपयुक्त शोध लागत असून आरोग्यशास्त्राचे ध्येय सारखे बदलत चालले आहे. आधुनिक आरोग्यशास्त्राचे ध्येय म्हणजे निसर्गाच्या सर्वव्यापी बुद्धीवर पूर्ण विश्वास ठेवून मनुष्यातील अंतर्गत जीवनशक्तीस पूर्णपणे मदत करण्याचे आहे. पूर्वी रोग झाल्याबरोबर औषधांच्या साह्याने तो बरा करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपले आरोग्यासंबंधी कर्तव्य संपठे असे मानीत असत; पण आता कोठे प्रकाश हवा पाणी अन्न व मानसिक शक्ती या नैसर्गिक परमौषधीचा शास्त्रीयरीत्या उपयोग करून कायमचे निरोगी कसे राहावे या गोष्टींचाच सर्व बाजूंनी विचार चाळू आहे ही फार शुभ आशा उत्पन्न करणारी गोष्ट आहे.