प्राचीनकाळी या हिंदुस्थान देशात विशेषकरून महाराष्ट्र देशात हिंदुराजे राज्य करीत असता त्यांचे हातून सर्व देश बहुतकरुन मुसलमानांचे ताबेत जाऊन तो यवनाक्रांत झाला. आणि त्यापासून हिंदुधर्मास नानातऱ्हेचे त्रास व जुलूम होऊ लागले. त्यापासून लोकांस सोडवून हिंदुराज्याची स्थापना केली आणि हिंदू धर्माचे रक्षण केले. असा जो “रजपूत घराण्यातील चितोडे शहरचे शिसोदे महाराणे याचे घराण्यांतील महाप्रतापी शिवाजी महाराज असून ते इकडे दक्षिण प्रांतात कसे आले व त्यांनी राज्यकारणे कशी केली व मुसलमानांचा पराभव करुन राज्य कसे संपादन केले व राज्य चालविण्याच्या रीती ठरवून ते कसे चालविले. आणि पुढे शिवाजीचे वंशज कसे झाले व सातारा येथे राज्याची गादी कोणी कशी स्थापना केली आणि त्या राजवंशात कोण-कोण पुरुष पुढे झाले या विषयी माहिती ह्या पुस्तकात आहे. राज्यसंबंधाने पराक्रम करुन मोठे पदवीस चढलेले प्रतिनिधी व अष्टप्रधान यांचे इतिहासाची माहिती लोकांस समजणे फार महत्त्वाची व योग्यतेची आहे. आणि अशी योग्य माहिती सर्व लोकांस समजणे अवश्य जाणून आम्ही सातारचे दप्तरातील चांगले माहितीवरुन व दुसऱ्या अनेक दाखल्यांवरुन हा ग्रंथ तयार केला आहे.