भगतसिंग हे एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांचं कार्य अतुलनीय आहे. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय ह्यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे लाला लजपत राय दोन आठवड्यांनंतर मरण पावले. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. जेम्स स्कॉट ह्याला ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. डिसेंबर १९२८ मध्ये भगतसिंग आणि त्यांचे सहकारी शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरू सहभागी होते. वयाच्या २३व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.