पुण्यश्लोक मातोश्री अहिल्याबाई होळकर यांचे आभाळाएवढे कर्तृत्व सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यावर आधारित अनेक चरित्रे कादंबऱ्या आजवर प्रकाशित झाल्या आहेत. पेशव्यांचे अत्यंत विश्वासू आणि अत्यंत पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांच्या सूनबाई आणि पतिनिधनानंतर माळवा प्रांताचा कारभार उत्तमप्रकारे सांभाळणाऱ्या कुशल प्रजाहितदक्ष आणि दानशूर प्रशासक म्हणून अहिल्याबाईंना आपण ओळखतो. पण आधी पती आणि त्यानंतर एकामागोमाग एक अशा जिवलगांचा मृत्यू ज्यांना बघावा लागला आणि तरीही ज्या वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून केवळ प्रजेचाच विचार करीत राहिल्या... मनातून कोसळलेल्या पण प्रजेसाठी आधार म्हणून खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या पेशवाईशी अभंग निष्ठा राखणाऱ्या आणि तरीही प्रसंगी आपल्या अधिकारांची जाणीव करून देणाऱ्या अहिल्याबाईंचे स्त्री अहिल्या हे रूप आणि त्यांचा जीवनप्रवास आपल्याला या कादंबरीत पाहावयास मिळतो. अर्थपूर्ण प्रभावी भाषा आणि खिळवून ठेवेल अशी शैली यामुळे सर्वच वर्गातील वाचकांना आणि अभ्यासकांनाही ही कादंबरी नक्कीच आवडेल. लेखिका मंजुश्री गोखले यांच्याबद्दल संत साहित्याच्या अभ्यासक आणि कादंबरीकार म्हणून आपण मंजुश्री गोखले यांना ओळखतो. आजवर त्यांची ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक पुस्तकांना सन्मान्य पुरस्कार मिळाले आहेत. उत्तम भाषाशैली आणि प्रसंग लेखनाची प्रभावी हातोटी हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या ज्ञानसूर्याचे आकाश संत निवृत्ति नाथ या चरित्रपर कादंबरीला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.