हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सौंदर्यपूर्ण व प्रवाही स्वरवाटांचा आनंददायी कोलाज म्हणजे ‘स्वराभिषेक’ हे पुस्तक. संगीत क्षेत्राची व्याप्ती, परंपरा खूप मोठी आहे. या अनुषंगानेच ‘सकाळ’ कोल्हापूर युनिटने या विषयाला वाहिलेला स्वराभिषेक दिवाळी अंक २०२२मध्ये प्रकाशित केला होता. त्यांचे हे पुस्तकरूप. उद्योग, चित्रकला, चित्रपट क्षेत्रांबरोबरच कोल्हापूरची संगीत परंपराही समृद्ध आहे. गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित मधुसूदन कानेटकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्याशी असलेले गुरुबंध सांगितले आहेतच. शिवाय विविध घराण्यांची सौंदर्यमूल्ये, त्यांची वाटचाल आणि सांगीतिक वैशिष्ट्यांसह गायकीची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या दिग्गजांचा प्रवासही अनवट आणि तितकाच प्रेरणादायी आहे. शास्त्रीय संगीताच्या प्रसारात आकाशवाणीच्या योगदानाची नोंद घेतली आहेच. तसेच विविध मैफलींचे रंगतदार अंतरंगही उलगडले आहे. पुस्तकातील लेखांच्या शेवटी अविस्मरणीय मैफली अनुभवण्यासाठी दिलेला ‘क्यूआर कोड’ रसिकांना दृक-श्राव्य स्वराभिषेकाने नक्कीच चिंब करेल. चला, तर मग या स्वराभिषेकाचा दुहेरी अनुभव घेऊ या...सहभागी लेखक : पंडित संजीव अभ्यंकर, डॉ. श्रुती सडोलीकर, पंडित हेमंत पेंडसे, पंडित सत्य शील देशपांडे, मंजिरी आलेगावकर, डॉ. विकास कशाळकर, डॉ. पौर्णिमा धुमाळे, शुभांगी बहुलीकर, पंडित सुहास व्यास, डॉ. समीर दुबळे, डॉ. विनोद ठाकूर-देसाई, राजेंद्र कंदलगावकर, डॉ. धनंजय दैठणकर, डॉ. चैतन्य कुंटे, चंद्रकांत लिमये, डॉ. राम देशपांडे, पतंजली मादुस्कर, अरुण द्रविड