मद्रासचे विद्वान इतिहासलेखक श्रीयुत सुब्रह्मण्य यांनी हे पुस्तक संशोधनपूर्वक लिहिले असल्याचे श्रीयुत अयंगार या प्रख्यात इतिहासतज्ञांनी आपल्या उपोद्घातात स्पष्ट म्हटलेच आहे. अशा या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. तो करीत असताना अवश्य त्या विशेष माहितीची भर ठिकठिकाणी घातली आहे. त्या मुळे हे पुस्तक आतापर्यंतच्या माहितीच्या निष्कर्षरूपाने मराठी वाचकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तंजावरचा शिलालेख विस्तृत असून तो मराठी भाषेत खोदविलेला आहे. त्याचे सर्व इंग्रजी भाषांतर श्रीयुत सुब्रड्मण्य यांना न मिळाल्याचे त्यांनी आपल्या भूमिकेत लिहिलेच आहे. तो दुर्मिळ शिलालेख मोठ्या प्रयत्नाने मिळवून मुद्दाम परिशिष्टात दिला आहे. त्यावरून इतिहास अभ्यासूंना अवश्य ते साहाय्य होईल अशी खात्री आहे. शिलालेखाचा सारांश आरंभी दिलाच आहे.