आत्मार्थं जीवलोकेऽस्मिन् को न जीवति मानवः। परं परोपकारार्थं यो जीवति स जीवति। (अर्थ - या जीवलोकांमध्ये स्वतःसाठी तर प्रत्येक जण जगत असतो. परंतु जो दुसऱ्यासाठी जगतो तोच खरे जीवन जगतो. ) ज्येष्ठ समाजसेवक श्री. राजाराम भापकर गुरुजी यांच्या जीवन कार्यावरील द माऊंटन मॅन हे पुस्तक म्हणजे एका ध्येयवादी शिक्षकाची संघर्षमय जीवन कहाणी आहे. ऐन तारुण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे यांची प्रत्यक्ष भेट व त्यांच्या विचारांचा प्रभाव भापकर गुरुजींवर पडला.
त्यातूनच त्यांच्या रस्ते उभारणीच्या कार्याला दिशा मिळाली. निसर्ग व पर्यावरण संरक्षण व्यसनमुक्ती शिक्षण प्रसार या क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणी याप्रमाणे त्यांची जीवनशैली आहे. आपले गाव तेथील माणसे .... त्यांची सुख - दुःखे यांच्याशी भापकर गुरुजी एकरूप होतात. त्यामुळेच आपल्या गावात बदलून आल्यानंतर तेथून शेजारील गावात जाण्यासाठी जवळचे चांगले रस्ते नाहीत त्यामुळे लोकांचे होणारे हाल पाहून ते व्यथित होतात.परिसरातील गावकरी शेतकरी - कष्टकरी आजारी व्यक्ती यांची
जवळच्या चांगल्या रस्त्यांअभावी होणारी दैना पाहून ते दुःखी- कष्टी होतात. यातूनच त्यांच्या मनात आकाराला येतो एक दृढ संकल्प ! सभोवतीच्या दुर्गम खडतर डोंगर रांगांतून एका सुबक सुंदर रस्त्याचे स्वप्न ते पाहतात. आजच्या व्यवहारी जगाच्या भाषेत वेडे ठरणारे भापकर गुरुजी... रस्त्यांसाठी ध्येयवेडे होतात. आणी सुरु होतो एक संघर्ष ... परिस्थितीशी दोन हात करण्याचा ! सुरुवातीला ग्रामस्थांची उदासिनता शासकीय अनास्था त्यांना नाउमेद करु पाहते. पण या सर्वांवर ते मात करतात. पदरमोड करीत स्वतःच्या कष्टाचा पैसा गुरुजी रस्त्याच्या कामासाठी खर्च करतात. हळूहळू समाजाचा पाठिंबा मिळू लागतो. लोकसहभाग व सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरू होतो. आज वयाच्या नव्वदीमध्येही ते गावात फेरफटका मारतात. लोकांची ख्याली -खुशाली विचारतात. त्यांचे कार्य आजची युवा पिढी तसेच समाजासाठी दिशादर्शक ठरणारे आहे. त्यांची ही संघर्षमय प्रेरक कहाणी लेखक श्री.बाळासाहेब देशमुख यांनी ग्रंथरूपाने वाचकांसमोर आणली आहे. सदर लेखकाची यापूर्वी श्रीक्षेत्र मांडवगण आणि सिद्धेश्वर दर्शन - ( 2021 ) आबा मास्तर - (2022 ) गुलमोहर - कन्या सौ. अश्विनी देशमुख यांचा काव्यसंग्रह ( 2019 ) व आता द माउंटन मॅन - ( 2023 )असे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. द माउंटन मॅन हा ग्रंथ युवा पिढी व समाजाला दिशादर्शक ठरणारा आहे.
डॉ.सुदर्शन चंद्रशेखर धस.
भ्रमणध्वनी - 9860495658
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.